उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार - मुख्यमंत्री

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात वेगानं विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयानं आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत आयोजित केलेल्या संकल्प ते सिध्दी परिषदेत बोलत होते. वेगवेगळया क्षेत्रातल्या उद्योजकांनी महाराष्ट्रात यावं यासासाठी संपूर्ण सहकार्य केलं जाईल, असं ते म्हणाले. राज्याच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना पुढच्या २५ वर्षात नेमकी काय प्रगती आणि विकास करायचा आहे याचं नियोजन करणं आवश्यक आहे.

समतोल विकास साधत असताना पायाभूत सुविधांसह राज्यातल्या प्रत्येक क्षेत्रावर लक्ष दिलं जाणार आहे. उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर राज्य ही महाराष्ट्राची ओळख कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. येणाऱ्या काळात रस्त्यांचं आणि पायाभूत सुविधांचं जाळं विस्तारण्यावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार  राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, सीआयआयचे पदाधिकारी, उद्योजक यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे देशाचं विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रानं कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचं योगदान दिलं आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्रानं उत्कृष्ट काम केलं असून येणाऱ्या काळात बांधले जाणारे रस्ते, रोप-वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत, असं ते म्हणाले.

राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यानं येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर देणं गरजचे आहे. साखर उद्योगाचं महाराष्ट्रात मोठं योगदान आहे. इथेनॉलला पेट्रोलच्या समान पातळीवरचं ऊर्जाउत्पादक मूल्याचं इंधन म्हणून प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, असंही गडकरी यांनी सागितलं. राज्यात विविध प्रकल्प आणि योजना राबवत असताना, एकात्मिक प्रगती साध्य करत असताना, शेवटच्या घटकापर्यंत ती पोचवण्यावर भर दिला जाईल, असं फडनवीस यांनी यावेळी सांगितलं. मेट्रो सेवा, बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प मुंबईला देशाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. मुंबई ही केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं पॉवरहाऊस आहे. पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान आणि नविनताभिमुख बाबी एकत्र करुन २०३० पूर्वी महाराष्ट्राला ट्रिलीअन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं फडनवीस म्हणाले. देशानं गेल्या ७५ वर्षांत वेगवेगळया क्षेत्रात केलेली प्रगती महत्वपूर्ण आहेच, पण येणाऱ्या २५ वर्षात कोणत्या क्षेत्रावर अधिक लक्ष देणं आवश्यक ठरेल याबाबतही नियोजन करणं आवश्यक आहे, असं मीनाक्षी लेखी यांनी यावेळी सांगितलं.  

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image