महानगरपालिकांच्या निवडणुकासाठी २९ जुलैला आरक्षण सोडत काढायचे निवडणुक आयोगाचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १३ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगानं येत्या २९ जुलैला आरक्षण सोडत काढायचे निर्देश दिले आहेत. इतर मागासवर्ग, इतर मागासवर्गीय महिला आणि खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी ही सोडत काढली जाणार आहे.

याआधी ३१ मे ला तेरा महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती यात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर महापालिकांचा समावेश होता. मात्र २० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार याची दुरुस्ती आता करणं आवश्यक आहे. 

न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने २५ जिल्हा परिषदा आणि २८५ पंचायत समिती यांच्या सर्वत्रिक निवडणुका संदर्भातही दुरुस्ती निर्देश जारी केले आहेत. यानुसार येत्या २८ जुलै रोजी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग आणि महिला प्रवर्ग साठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. याशिवाय राज्यातल्या १५५  नगरपरिषदा आणि ९ नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठीही दुरुस्ती आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केले आहेत.