महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गेल्या आठ वर्षांत,केंद्र सरकारनं महिलांवर लक्ष केंद्रित करणार्‍या अनेक योजना सुरू केल्या आहेत आणि त्यांना त्यांचा योग्य सामाजिक सन्मान आणि त्यांचे उत्पन्नाचे मार्ग सुनिश्चित करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, असंही मोदी म्हणाले. सरकारनं प्रत्येक स्तरावर समानता आणण्यासाठी, महिलांचे सक्षमीकरण आणि बालशिक्षणाच्या उन्नतीसाठी क्रांतिकारी पावलं उचलली आहेत.

भारताच्या विकासाच्या प्रवासात त्यांचा पूर्ण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सरकार आपल्या माता-भगिनींच्या अडचणी कमी करण्यावर भर देत आहे.११ कोटी ५ लाखांहून अधिक शौचालयांमुळे महिलांचं जीवन सुसह्य झालं आहे. साडेनऊ कोटींहून अधिक कुटुंबांना नळ जोडणी मिळाली. मुद्रा योजनेच्या ६८ टक्के महिला लाभार्थी आहेत. महिलांसाठी ९ कोटी १७ लाख गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. २ कोटी ७८ लाखांहून अधिक  महिलांनी आर्थिक सहाय्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे.

प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा अभियानांतर्गत ३ कोटी ११ लाख मोफत प्रसूतीपूर्व तपासणी करण्यात आली. सशुल्क प्रसूती रजा १२ आठवड्यांवरून २६ आठवड्यांपर्यंत वाढवली आहे. २ कोटी ७३ लाख सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाती उघडण्यात आली आहेत. तसंच महिलांसाठी जाचक ठरणारी तिहेरी तलाकची प्रथाही केंद्र सरकारनं रद्द केली आहे.सशस्त्र दलांमध्ये महिलांसाठी कायमस्वरूपी आयोगही नेमला आहे. अशा अनेक योजना केंद्रानं खास महिलांसाठी सुरू केल्या आहेत, असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.