स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या मुलांकरिता मोफत ई- लर्निग ॲप

 

मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि स्माईल्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारातून राज्यातील लाखो महिलांच्या शालेय शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना बायजूज या कंपनीचे प्रीमियम दर्जाचे ई-लर्निग ॲप मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती ग्राम विकास व पंचायती राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिली.

राज्याच्या ग्रामीण भागातील सामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे हे महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाचे ध्येय आहे. यासाठी त्यांच्या उत्पन्न वाढीसोबतच त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचे जीवनमान उंचावणे देखील महत्वाचे आहे. यासाठी स्माईल्स फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे, असे श्री.राजेशकुमार यांनी असे सांगुन विभागाच्यावतीने त्यांचे अभिनंदन केले.

अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी यावेळी या करारातून ग्रामीण क्षेत्रातील महिलांच्या ४ थी ते १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना हे ऍप मिळणार आहे. तसेच या ऍप मुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढेल आणि गुणवत्ता वाढीस मदत होईल, असे सांगितले.

स्माईल्स फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती उमा आहुजा आणि धीरज आहुजा यांना अपर मुख्य सचिव यांचे हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. फाउंडेशनच्या वतीने धीरज आहुजा यांनी राज्यभर ग्रामीण महिलांसाठी कार्य करणार असल्याचे सांगितले. ग्रामीण विद्यार्थ्यांना या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देत असल्याबद्दल स्माईल्स फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांना अभिमान आहे, भविष्यातही उमेद अभियानाच्या उपक्रमांमध्ये आमचा सक्रिय सहभाग असेल, असे सांगितले.