प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देहूमधल्या संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण

 


पुणे : पुणे जिल्ह्यात श्री क्षेत्र देहू इथं नव्यानं उभारलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिळा मंदिराचं लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. देशाचे प्रधानमंत्री देहू नगरीत येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने टाळ मृदंगाच्या आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या जयघोषात मोदी यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. आज लोकार्पण झालेल्या शिळा मंदिराचा भूमिपूजन समारंभ २००८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवल्यानंतर ती पुन्हा वर येईपर्यंत चे १३ दिवस तुकाराम महाराज याच शिळेवर बसून होते अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळेच देहुमध्ये येणारा प्रत्येक वारकरी या शिळेच दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. या शिळेच भव्य मंदिर आता देहूत उभं राहिलं आहे. या कार्यक्रमासाठी मोदी यांचं देहू नगरीत आगमन झाल्यानंतर त्यांनी देहुतल्या मुख्य मंदिरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणीचं त्यांनी घेतलं. मंदिरासमोर उभारल्या भागवत धर्माची पताका असलेल्या ६१ फुटी स्तभाचं त्यांनी पूजन केलं आणि प्रदक्षिणा मार्गावरच्या भगवान शंकराचं दर्शन घेऊन मोदी शिळा मंदिराच्या गर्भगृहात आले. या मंदिराच्या लोकार्पण समारंभानंतर मोदी यांनी या मंदिरातूनच इंद्रायणी माता आणि भंडारासह ३ डोंगरांचं देखील दर्शन घेतले. यावेळी देहू मंदिर समितीचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी त्यांना तुकाराम महाराज यांच्या गाथेच हस्तलिखित दाखवलं आणि तुकाराम महाराजांचे प्रतीक समजली जाणारी खास पगडी आणि तुळशीची माळ देऊन मोदी यांचा सत्कार केला. संत चोखामेळा यांच्या सार्थ गाथेची प्रत यावेळी मोदी यांना देण्यात आली. शिळा मंदिरातील या कार्यक्रमानंतर मोदी सभा स्थळी रवाना झाले. तिथं प्रधानमंत्र्यांनी देहू इथं केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांबाबत माहिती दिली.