समाजाच्या प्रगतीमध्ये आणि देशाच्या विकासात तरुणाईची भूमिका महत्त्वाची असते - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजाच्या प्रगतीमध्ये आणि देशाच्या विकासात तरुणाईची भूमिका महत्त्वाची असते, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. कुंडलधाम इथल्या  श्री स्वामीनारायण मंदिराद्वारे आयोजित युवा शिबिराला, राष्ट्रपतींनी  आज ध्वनीचित्रमुद्रित संदेशाच्या माध्यमातून संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. नैसर्गिक आपत्ती काळात गरजूंना मदत देऊन, आणि महामारीच्या काळात देवळाचं  रूपांतर कोविड रुग्णालयामध्ये करून, कुंडलधामच्या श्री स्वामीनारायण मंदिराने देशसेवेचा आदर्शच निर्माण केला आहे, अशा शब्दांत त्यांनी या संस्थेचं कौतुक केलं. हवामानबदलाने उभ्या केलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपली पारंपरिक ग्रामीण जीवनशैली जगाला मार्गदर्शक ठरू शकते, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. पर्यावरणाचं  संवर्धन करून तसंच निसर्गाची सहानुभूतीपूर्वक जपणूक करून आपण आपल्या पृथ्वीला हवामानबदलासारख्या संकटांपासून वाचवू शकतो, असं ते यावेळी म्हणाले.