सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केलेल्या आवाजाच्या पातळीची मर्यादा पाळून अजान दिली जावी- राज ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भोंग्यांच्या विरोधात आज आंदोलन सुरू केलं. जिथं भोंगे उतरवले असतील तिथल्या ठिकाणी नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

हे भोंगे काढण्यासाठी नागरिकांनी पोलिस ठाण्यांना पत्र द्यावीत, तक्रार दाखल करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केलेल्या आवाजाच्या पातळीची मर्यादा पाळून अजान दिली जावी, असं त्यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. जोपर्यंत भोंगे चालू राहतील तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहील, असं ते म्हणाले. मंदिरावर असलेल्या भोंग्याचाही कुणाला त्रास होत असेल, तर तोही हटवला पाहिजे, असंही ते म्हणाले.

मुंबईतल्या अनेक भागांत मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालिसाचं पठण केलं. राज ठाकरे यांनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात पोलीस बंदोबस्त आहे, तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद शहरामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती इथं हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. धुळे इथं मनसे जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख आणि त्यांचे सहकारी आज सकाळी शिवतीर्थ इथं जमले असताना त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.

नाशिक आणि मालेगावमध्ये पोलीस यंत्रणेनं विशेष दक्षता घेतल्यानं तणाव निर्माण होऊ शकला नाही. मालेगाव मध्ये बहुतांश मशिदींमध्ये पहाटेची नली, मात्र पेालीसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भोंगे न लावता प्रार्थना पार पडली. नाशिक शहरातही भोंगे न लावता अजान देण्यात आली. संवेदनशील चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असून जुनं नाशिक, माालेगाव इथंही राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली आहे. सातपूर मध्ये काही कार्यकर्त्यांना आज सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पालघरमध्ये मनसेचे शहर अध्यक्ष सुनील राऊत यांच्यासह इतर पाच कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.