डिमॅट खात्यांची वाढती संख्या पाहता देशातील युवा गुंतवणूकदार जोखीम पत्करण्यास सज्ज - निर्मला सीतारामन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात 2021-22 या आर्थिक वर्षाच्या प्रत्येक महिन्यात 26 लाख नवी डिमॅट खाती उघडली गेली असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत दिली. एन एस डी एल म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये  महिन्याला सुमारे चार लाख नवी डिमॅट खाती उघडली जात होती. त्यानंतर 2020-21 या वर्षात हीच संख्या तिपटीने वाढून 12,00,000 खाती झाली.

देशातले तरुण आणि नवगुंतवणूकदार गुंतवणुकीच्या बाबतीत शेअर बाजाराची जोखीम घेण्यास तयार आहेत, हेच डिमॅट खात्यांची वाढती संख्या सांगते आणि हे चित्र आशादायी आहे असं त्या म्हणाल्या. एनएसडीएल आणि सेबीच्या कार्याची माहिती देताना किरकोळ गुंतवणूकदारांचे हितसंबंध जपले जात असल्याची ग्वाही त्यांनी दिली.