बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह

 

मुंबई : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबईच्या श्रीमती सुशीबेन शाह यांची, तर त्यांच्यासोबत अन्य सहा जणांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे बालकांच्या विविध प्रश्नांना आता न्याय मिळेल, असा विश्वास महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, गेली अनेक वर्षे विविध सामाजिक प्रश्नांसोबतच बालकांच्या मूलभूत हक्क आणि अधिकाराबाबत जागरूकतेचे कार्य श्रीमती सुशीबेन शाह करीत आहेत. यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांनी कार्य केले आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी ॲड. नीलिमा चव्हाण, ॲड. संजय सेंगर, ॲड. प्रज्ञा खोसरे, ॲड. जयश्री पालवे, सायली पालखेडकर आणि चैतन्य पुरंदरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पद धारण केल्यापासून पुढील तीन वर्षांसाठी आहे किंवा पद धारण केलेल्या दिनांकापासून अध्यक्षांच्या बाबतीत वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत आणि सदस्यांच्या बाबतीत वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत इतका कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अध्यक्ष व सदस्य निवडीबाबतची अधिसूचना महाराष्ट्र  शासनाच्या राजपत्रात नुकतीच प्रसिध्द झाली आहे.

महाविकास आघाडी सरकार बालकांना त्यांचे हक्क, अधिकार याबाबत संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून राज्यातील बालकांच्या हक्काबाबत जनजागृतीसह वंचित, उपेक्षित आणि अनाथ बालकांना न्याय मिळण्यासाठी आयोग अत्यंत जिव्हाळ्याने आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम करील अशी मला आशा आहे, असे मत मंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केले. राज्यातील अनाथ, एकल, रस्त्यावरील मुले, बालकामगार यांच्या न्याय हक्कांसाठी, शिक्षणासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करून हा आयोग त्यांना न्याय मिळवून देईल, असा विश्वास मंत्री ॲड.ठाकूर व्यक्त करून बालहक्क संरक्षण आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष आणि नवनियुक्त सहा सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Popular posts
वादमुक्त, शांत, घुसखोरी मुक्त आणि शस्त्रास्त्र मुक्त ईशान्य भारत घडवण्याचा सरकारचा उद्देश असल्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही
Image
केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी
Image
भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये
Image
शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीच्या सुधारणाबाबत खेळाडू, नागरिक,संघटना यांच्याकडून सूचना व अभिप्राय 22 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन
Image
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image