भारतात गुंतवणुकीसाठी येण्याचं प्रधानमंत्री यांचं जपानमधल्या उद्योजकांना आवाहन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  वस्त्रोद्योग, तंत्रज्ञान आणि कारखानदारी क्षेत्रातलं मुख्य केंद्र म्हणून भारत उदयाला येत असताना जपान च्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करून या वाटचालीत सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. क्वाड देशांच्या नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी प्रधानमंत्री आज सकाळी जपानची राजधानी टोक्यो इथं दाखल झाले. जपानी कंपनी NEC कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. नोबुहिरो एंडो यांची त्यांनी भेट घेतली. कंपनीनं भारताच्या दूरसंचार क्षेत्रात दिलेल्या सहकार्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी युनिक्लो चे अध्यक्ष तदाशी यानाई, सुझुकी मोटर्सचे सल्लागार ओसामू सुझुकी, सॉफ्टबँक समूहाचे संस्थापक मासायोशी सोन यांच्याशीही संवाद साधला. यावेळी उभयतांनी तंत्रज्ञान, ऊर्जा, वित्त, इत्यादी क्षेत्रात सॉफ्टबँकच्या भारतातल्या सहभागावर चर्चा केली. या दौऱ्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यात आज हिंद प्रशांत आर्थिक मंचाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या उपस्थितीत झालं. सर्वसमावेशक हिंद -प्रशांत आर्थिक मंचासाठी काम करायला भारत उत्सुक असल्याचं मोदी यांनी सांगितलं. हिंद प्रशांत क्षेत्रात जगातली ५० टक्के लोकसंख्या एकवटलेली आहे, जगाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ६० टक्के भाग या देशांकडून येतो, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री आज दुपारी जपानमधल्या  भारतीय वंशांच्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत.