सीबीआयनं स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, त्यांचे मध्यस्थ आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित असलेल्या ४० ठिकाणी टाकले छापे

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्वेषण विभागानं स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, त्यांचे मध्यस्थ आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित असलेल्या ४० ठिकाणी काल छापे टाकले. या ठिकाणी कथितरित्या परदेशी निधी नियमांचं उल्लंघन केलं जात होते. दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोईम्बतूर, म्हैसूर आणि राजस्थानमधील काही ठिकाणी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. सीबीआयने सांगितले की छाप्यांमध्ये आतापर्यंत २ कोटी रुपयांचे हवाला व्यवहार आढळून आले आहेत. गृह मंत्रालयातील अनेक अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि मध्यस्थ यांनी परदेशी देणग्या सुलभ करण्यासाठी परकीय अंशदान नियमन कायद्याचं उल्लंघन करून पैशांची देवाणघेवाण केली. आतापर्यंत, सीबीआयनं या प्रकरणाशी संबंधित गृह मंत्रालयातील अधिकारी आणि एनजीओ प्रतिनिधींसह सुमारे सहा जणांना अटक केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे देशभरात छापे टाकण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.