मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु

 

मुंबई : मुंबईत अग्निशमन प्रतिबंधक नियमांचे नोटिस बजावूनही पालन न केल्याने मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरु केली आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत १० जणांचा त्यानंतर भांडुप येथील सनराईज रुग्णालयात ११ जणांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनांनंतर पालिकेच्या तपासणीत उपाययोजनांचे पालन न करणाऱ्या ६६३ रुग्णालयांना पालिकेने नोटीस बजावली होती.

नोटिशीनंतर ६३९ रुग्णालयांनी अग्नी प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित केली तर २४ खासगी रुग्णालयांना त्रूटी दूर करण्यासाठी १२० दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीत संबंधित रुग्णालयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या २४ रुग्णालयांचा परवाना रद्द केला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.