इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढी विरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज आज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी सदनाचं कामकाज सुरु होताच ते, स्थगित करण्याची काँग्रेस, तृणमूल, डावे आणि द्रमुकच्या सदस्यांनी केलेली मागणी सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली. सभासदांना वित्त विधेयकावर चर्चा करण्याची संधी असून, ते इंधन दरवाढीच्या विषयावर चर्चा घडवू शकतात, असं नायडू यांनी सांगितलं. त्यावर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. कामकाज पुन्हा सुरु होताच काँग्रेस, तृणमूल, डावे आणि द्रमुकच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. गदारोळ सुरु असूनही उपसभापती यांनी सभागृहाचं कामकाज पुढे सुरु ठेवण्याचा प्रयत्न करत प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गदारोळामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. तत्पूर्वी आसाम, केरळ आणि नागालँडमधून निवडूण आलेल्या सहा नवीन राज्यसभा सभासदांनी शपथ घेतली.