सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेश देशमुख
पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक सर्व शेतकऱ्यांना देशातील बँकिंग व्यवस्थेअंतर्गत पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मोहिम स्तरावर प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, नाबार्डचे रोहन मोरे तसेच जिल्ह्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गतवर्षी विक्रमी पीक कर्ज वाटप केल्याबद्दल सर्व बँकांचे अभिनंदन करून डॉ.देशमुख म्हणाले, यावर्षीदेखील ४ हजार कोटींच्या पीक कर्ज आराखड्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सुरूवातीपासून प्रयत्न करावे. २४ एप्रिल ते १ मे या कालावधीत प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक १ कोटी ३३ लाख शेतकऱ्यांचा किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत समावेश करण्यासाठी प्रत्येक बँक शाखेच्या पातळीवर प्रयत्न करावे. त्यासाठी प्रत्येक शाखेसाठी समन्वयक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि प्रत्येक दिवशी या मोहिमेचा आढावा घेण्यात यावा.
प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध शासकीय विभागांची मदत घेण्यात यावी. २४ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामसभेत अधिकाधिक शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करावा. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यासाठी बँक स्तरावर आढावा घेण्यात यावा. सर्वांनी मिळून जिल्ह्याला या मोहिमेत प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी व पशुपालन आणि मत्स्य व्यवसायातील व्यवसायिकांनी गावातील राष्ट्रीयकृत किंवा अन्य व्यापारी बँकेशी संपर्क साधून किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा आणि ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहीम यशस्वी करून आपली स्वतःची आणि गावाची प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यां केले.
श्री.कारेगावकर म्हणाले, २४ एप्रिल रोजी प्रत्येक गावात ग्रामसभा घेण्यात येणार आहे. बँक प्रतिनिधींनी या ग्रामसभेत सहभागी होण्याचा प्रयत्न करावा आणि किसान क्रेडीट कार्डचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती घ्यावी. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात यावी. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देत त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून ही मोहीम त्याचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय व कृषी मंत्रालयाच्या सूचनेनुसार 'किसान भागीदारी प्राथमिकता हमारी' ही विशेष मोहीम राबविणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आजवर बँकांकडून पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड घेतलेले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी शेतीसाठी खेळते भांडवल म्हणून या योजनेअंतर्गत पैसे घ्यावेत आणि त्याचा उपयोग करून आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवावे असा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही मोहीम प्राधान्याने राबविण्याच्या सूचना बैठकीत सर्व बँकांना देण्यात आल्या.
शेतीसोबतच पशूपालन किंवा मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या तिन्हीसाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याची व्यवस्था बँकांमार्फत करण्यात आलेली आहे. तसेच ज्या व्यक्ती केवळ पशुपालन किंवा मत्स्यपालन या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत अशा व्यक्तींनादेखील किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत कर्जाची उपलब्धता करून देण्याची व्यवस्था बँकांमार्फत करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंगभूत वैशिष्ट्याद्वारे लाभार्थ्यांना व्याजाच्या सवलतीचा लाभ उपलब्ध करून देणे आणि खेळत्या भांडवलाच्या मदतीने आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
शेतकरी बांधवांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन ही योजना यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी केले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.