संपूर्ण जगच युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची भीती - सर्गेई लावरोव्ह

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाबरोबर छुपं युद्ध करण्यासाठी नाटो देश स्वतःला अणवस्त्र सज्ज करत आहे. यामुळे कदाचित संपूर्ण जगच युद्धाच्या खाईत लोटलं जाण्याची भीती आहे असं मत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी व्यक्त केलं.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते . रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवण्याची प्रतिज्ञा करण्यासाठी  अमेरिका आणि मित्रराष्ट्र भेटले असताना, लावरोव्ह यांनी हे विधान केलं आहे. दरम्यान लावरोव्ह यांच हे वक्तव्य म्हणजे रशियाला युक्रेनमधील पराभवाची झालेली जाणीव आहे, परिणामी युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या देशांना घाबरावण हाच या विधानांचा मुख्य उद्देश असल्याचं मत युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी व्यक्त केलं.

युरोप आणि जागतिक सुरक्षेसाठी जगाने युक्रेनला अधिक पाठिंबा दिला पाहिजे असही  कुलेबा म्हणाले. युक्रेनला पाठिंबा देण्याच्या संकल्पात ४० पेक्षा अधिक राष्ट्रे एकजुटीनं उभी असल्याचं मत अमेरिकेच्या संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन  यांनी व्यक्त केलं. ४० हून अधिक देशांतील अधिकार्‍यांचे जर्मनीतील रॅमस्टीन हवाई तळावर स्वागत करताना ते बोलत होते.