९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २२ ते २४ एप्रिलदरम्यान उदगीर इथं होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार आहेत. लातूर जिल्ह्यात होणारं हे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. ते सर्वांच्या प्रयत्नाने यशस्वी करु असा विश्वास या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, मावळते अध्यक्ष जयंत नारळीकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोधर मावजो यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात सीमावर्ती जिल्ह्यातले लोक सहभागी होणार आहेत. तसेच बाल साहित्यिकांना मोठा वाव देण्यात आला आहे. पहिल्यांदा साहित्य संमेलनाच्या मंचावरून पर्यावरण या विषयावर परिसंवाद होणार असल्याची माहिती राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली. या संमेलनादरम्यान संगीतकार अजय – अतुल यांची संगीत रजनी, अवधुत गुप्ते यांचा कार्यक्रम तसंच डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, यांचा ” चला हवा होऊ द्या ” हा कार्यक्रम होणार आहे.