आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा १९ मे पासून

 

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२२ परीक्षा १९ मे २०२२ पासून सुरु होणार आहेत. या परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जाणार असून, पहिला टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाचा आहे.

विद्यापीठाच्या उन्हाळी २०२२ परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील विविध परीक्षाकेंद्रावर उन्हाळी सत्र २०२२ परीक्षेसाठी एकूण २,२०० विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. दुसरा टप्पा हा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम वगळता उर्वरित सर्व पदव्युत्तर आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या वैद्यकीय, दंत आयुर्वेदिक, यूनानी, होमिओपॅथी, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, भाषा श्रवणदोष, कृत्रिम अवयव विज्ञान परिचर्या व सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या सर्व वर्षाच्या लेखी परीक्षा १ जुलै २०२२ पासून सुरु होणार असून, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी समाप्त होणार आहेत. सदर परीक्षेसाठी एकूण ४५ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.

विद्यापीठाच्या हिवाळी सत्र २०२१ परीक्षेचे निकाल १४ दिवसांच्या आत विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत सर्व आरोग्य विज्ञान विद्याशाखांचे पदवीच्या ७४,६६१ विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन सुरु आहे. सदर परीक्षांचे निकाल मे २०२२ अखेरीस जाहीर करण्याचे प्रस्तावित आहे.

विद्यापीठाच्या परीक्षेविषयी अधिक माहिती विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in वर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.