‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित केलेल्या रुग्णांच्या अवयवदानाबाबत त्यांच्या नातेवाईकांमध्ये जागृती निर्माण करायची गरज - डॉ. एस. एस. काळे

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अपघातामध्ये डोक्याला इजा झाल्यानं ‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या रुग्णांच्या अवयवदानाबाबत त्यांच्या नातेवाईकांमध्ये जागृती निर्माण करायची गरज असल्याचं AIIMS अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतले मेंदू-विकार शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. काळे यांनी म्हटलं आहे. गेल्या २० मार्च रोजी World Head Injury Awareness Day निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अपघातग्रस्त रुग्णांपैकी जवळजवळ १५ टक्के रुग्णांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचं आढळून येतं.तज्ञ डॉक्टरांच्या पथकानं केलेल्या विविध प्रकारच्या चाचण्यांनंतर या रुग्णांना ‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित केलं जातं. अशा वेळी नातेवाईकांनी या रुग्णाच्या अवयवदानाची परवानगी द्यायला पुढे यायला हवं असं ते म्हणाले. ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात आलेला रुग्ण आपल्या  मृत्यू पश्चात डोळे, हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुसं या अवयवांचं दान करून अन्य ८ रुग्णांचे प्राण वाचवू शकतो, असं AIIMS मधले मेंदू-विकार शल्य चिकित्सा विभागातले डॉ. दीपक कुमार गुप्ता यावेळी म्हणाले.