पारंपरिक औषधांसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचं वैश्विक केंद्र देशात उभारलं जाणं, हा देशाचा सन्मान

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पारंपरिक औषधांसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचं वैश्विक केंद्र देशात उभारलं जाणं, हा देशाचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या ट्विटर संदेशात मोदी यांनी भारताची पारंपरिक औषधं  आणि आरोग्य विषयक सवयी जगभरात लोकप्रिय ठरत आहेत, याकडे लक्ष वेधलं. या केंद्राद्वारे देशवासीयांचं आरोग्यमान सुधारण्याबरोबरच, देशाच्या समृद्ध परंपरेचा लाभ साऱ्या विश्वाला होणार असल्याचंही ते म्हणाले. गुजराथमधल्या जामनगर मध्ये हे वैश्विक केंद्र उभारण्याबाबत जागतिक आरोग्य संघटना आणि  भारत सरकार यांच्यामध्ये करार झाला आहे. काल जिनेव्हा इथं या करारावर ‘आयुष’’चे सचिव वैद्य राजेश कोटेचा आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक अधानम गैब्रेयासिस यांनी सही केली. 

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, जगभरातल्या पारंपरिक औषधांची उपचारक्षमता जाणून घेऊन लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी या केंद्राद्वारे प्रयत्न होणार आहेत. भारतानं  यासाठी २५० दशलक्ष डॉलर्सचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जगभरातले लक्षावधी लोक पारंपरिक औषधांचाच प्रथम वापर करतात. या सर्वांना परिणामकारक आणि सुरक्षीत औषधं उपलब्ध होणं, हे जागतिक आरोग्य संघटनेचं उद्दिष्ट आहे, असं WHO चे महासंचालक अधानम गैब्रेयासिस यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात भारताच्या सहकार्याची त्यांनी प्रशंसा केली. दरम्यान, प्रधानमंत्री मोदी यांनी एका वेगळ्या ट्विटर संदेशाद्वारे, दोहा मधे योगवर्ग आयोजित केल्याबद्दल भारतीय दूतावासाचं कौतुक केलं आहे. आरोग्यमयी जीवनासाठी योग सगळ्या जगाला एकत्र आणत आहे, असंही मोदी यांनी म्हटलंय.