सर्वसाधारण मास्क ऐवजी तीन पदरी किंवा N 95 मास्क वापरण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. या वर्गांचे विद्यार्थी ऑनलाईन वर्गांना हजेरी लावू शकतील. पालकमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी ही घोषणा केली. सर्व साधारण मास्क वापरून फारसा फायदा होत नाही, असं वैद्यकीय तज्ञांचं मत आहे. त्यामुळं सर्व नागरिकांनी तीन पदरी किंवा N 95 मास्क वापरावे असे आवाहन त्यांनी सर्व नागरिकांना केलं. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना काढण्याची विनंती केंद्र सरकारला केली असल्याचं त्यांनी सांगितलं. पुण्यात उद्यापासून मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तर रस्त्यावर थुंकणाऱ्यांना १ हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. यापुढे लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच पुणे जिल्ह्यातल्या सरकारी कार्यालयात परवानगी मिळणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव तसंच इतर वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.