महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात येत असून, महिला आणि बालविकास  भवनाचे बांधकाम प्रस्तावित आहे, असं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काळ अमरावती इथं सागितलं. राज्यात प्रायोगिक तत्वावर मान्यता देण्यात आलेल्या अमरावती पॅटर्नप्रमाणेच बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. या बांधकामासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत थेट सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात येणार आहे. एकात्मिक बालविकास योजनेत अंगणवाडी केंद्राचे नवीन बांधकाम करणे, नलिकांद्वारे पाणीपुरवठा करणे, वीज पुरवठा, स्वयंपाक घरांचे आधुनिकीकरण, तसेच अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे विस्तारीकरण अशा विविध कामांचा यात समावेश करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या एकूण १५ हजार ६२२ कोटी रुपयांच्या जिल्हा नियोजन विकास योजनेच्या वार्षिक निधीतून सुमारे ४६८ कोटी रुपये महिला आणि बालविकास विभागाच्या विविध योजनांसाठी उपलब्ध होणार आहेत, असे ही ठाकूर यांनी काल सांगितले.