राज्यातल्या आरक्षित जागांसाठीचं मतदान शांततेत सुरू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात ५ नगरपंचायतींमध्ये ११ जागांसाठी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत ५२ पूर्णांक ९१ शतांश टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वाशिम जिल्ह्यात मानोरा नगरपंचायतीच्या ४ प्रभागांमधल्या १८ जागांसाठी आज सकाळी शांततेत मतदान सुरू झाले असून दुपारी दीड वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झालं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी नगरपंचायतीसाठी ३ हजार ५८७ पैकी १ हजार ८६७ मतदारांनी दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. भंडारा जिल्हा परिषद, तसंच पंचायत आणि नगर पंचायतीसाठी दुसऱ्या टप्प्यातल्या मतदान सुरु आहे.‌ भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ जागांसाठी, पंचायत समितीच्या २५, तर नगर पंचायतीच्या १२ जागाकरिता मतदान होत असून सकाळपासूनच मतदार मतदान केंद्रावर आपला हक्क बजावत आहेत,तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांच्या स्वगावी सुकळी इथं मतदान केलं. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत १९ पूर्णांक १९ शतांश टक्के मतदान झालं. मोहाडी, लाखणी, लाखांदूर या तीन नगरपंचायतींमध्ये सकाळी दुपारी दीड वाजेपर्यंत ४१ पूर्णांक ५५ शतांश टक्के मतदान झालं.