प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा युवा वर्ग हा विकासाचा चालक असून देशाच्या सुख आणि सुरक्षेचे मार्ग युवकच तयार करतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज स्वामी विवेकानंदाच्या जयंतीनिमित्त पुद्दुचेरी इथं आयोजित राष्ट्रीय युवक महोत्सवाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. भारतातल्या युवकांकडे लोकशाही मूल्ये आहेत त्यामुळे जग भारताकडे आशेनं, विश्वासानं बघत आहे, असं ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी आज एम.एस.एम.ई तंत्रज्ञान केंद्राचं लोकार्पणही केलं. आत्मनिर्भर भारतासाठी एम.एस.एम.ई ची भूमिका महत्वाची आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत स्टार्टअपच्या सुवर्णकाळात प्रवेश करत आहे. सध्या ५० हजारापेक्षा जास्त स्टार्टअपची  इको सिस्टीम भारताकडे आहे, असं त्यांनी सांगितलं.  मुलगी आणि मुलगा समान असतात अशी सरकारची भावना आहे ह्या विचारातनच मुलींच्या लग्नाचं वय वाढवून २१ वर्ष करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुलीही त्यांचं करियर करू शकतात त्यासाठी त्यांना अधिक वेळ मिळाला पाहिजे, यादृष्टीनं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे असं प्रधानमंत्री म्हणाले.