राज्यातल्या धोकादायक आणि जीर्ण पूलांची कामं करण्यासाठी सरकार कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार - अशोक चव्हाण यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या धोकादायक आणि जीर्ण पूलांची कामं करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्याबरोबरच, नव्यानं उभारले जाणारे पूल आणि दुरुस्ती करायच्या पुलांच्या कामांचे नकाशे, आराखडे महिनाभरात विभागाकडे सादर करण्याचे निर्देश, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात धोकादायक आणि जीर्ण पुलांचा विषय उपस्थित झाला होता. त्या अनुषंगानं राज्यातल्या अशा सर्व पुलांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. राज्यातले राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर असलेल्या ज्या पुलांच्या कामाकडे तातडीनं लक्ष देणं आवश्यक आहे, तसंच ज्या पुलांची कालमर्यादा संपली आहे, अशा सर्व पुलांचं स्ट्रकचरल ऑडिट करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या. नवीन पूल बांधत असताना त्या-त्या भागातलं सर्वाधिक पर्जन्यमान लक्षात घेणं गरजेचं असून, पुलाची उंची पूर पातळीपेक्षा अधिक असेल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पुलाचं डिझाईन करत असताना बंधारा टाईप पूल बांधले तर त्यामाध्यमातून जलसंधारणाचा हेतूही सफल होणार असल्यानं त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. पुलांची उभारणी करताना त्यात सौंदर्यदृष्टी, वापरकर्त्यांसाठी सुविधा यासह पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विचार करावा आणि सौरउर्जेची निर्मिती करण्यासारख्या संकल्पनेवरही अभियंत्यांनी अभ्यास करावा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन त्यांनी केलं. फायबर कॉंक्रिट तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक विभागात किमान एका पुलाची उभारणी करावी, कोकणात अतिवृष्टी, महापुरामुळे नुकसान झालेल्या पुलांची कामं प्राधान्यानं हाती घ्यावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.