राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करता येणार नसल्याचं अजित पवार यांचं स्पष्टीकरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्यास राज्यावर मोठा आर्थिक बोजा पडेल त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर राज्याकडून लागू कर  कमी होण्याची शक्यता नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. कार्तिक यात्रेनिमित्त पंढरपुरातील विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. सध्या तरी राज्याला उत्पन्नाचं दुसरं  कोणतंही  साधन नाही. राज्याची आर्थिक घडी अजूनही नीट बसलेली नाही त्यामुळे राज्यांचा कर कमी होण्याची शक्यता नाही. तरीही येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या ६० वर्षात कधीही  एसटीच्या   सरकारमध्ये विलीनीकरणाचा  मुद्दा समोर आला नव्हता. मात्र विरोधी पक्षाकडुन  जाणूनबुजून हा प्रश्न चिघळवला जात आहे. राज्यातील विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आज उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते आज सपत्नीक महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी तसंच राज्यातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांना यश द्यावं. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती आणि समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावं त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी, असं साकडं अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या  चरणी घातलं. यावेळी मानाचे वारकरी म्हणून कोंडीबा आणि प्रयागबाई  टोणगे या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मान मिळाला.