केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जम्मूमध्ये २५ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जम्मूमध्ये २५ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे. एकूण २५७ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यांसाठी ११ हजार ७२१ कोटी रुपये खर्च येणार आहे. या रस्त्यांमुळे जम्मू आणि काश्मीर खोऱ्यादरम्यान वर्षभर कोणत्याही वातावरणात दळणवळण सुरु ठेवता येणार आहे. सुरक्षा दलांना वेगानं हालचाल करण्यासाठी हे रस्ते महत्त्वाचे आहेतच, शिवाय कृषी आणि उद्योग या क्षेत्रांसाठी आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी हे रस्ते उपयुक्त ठरणार आहेत. या प्रकल्पांद्वारे विविध जिल्हा मुख्यालयांना जोडणाऱ्या मोठ्या रस्त्यांना एकमेकांशी जोडलं जाणार आहे.