राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तर लोकसभेचं कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन झालेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. तेलंगणा राष्ट्र समितीच्या सदस्यांनी सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी सुरु केली. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.राज्यसभेत काल या अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलेल्या १२ सदस्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या लोकसभा सदस्यांनी आज सभात्याग केला. त्यानंतर सभापतींनी कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर ३ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं.