कोरोनाच्या संकटातून जग पूर्वपदावर येत असल्याचे जी-20 देशांच्या परिषदेत संकेत, रोम जाहीरनामा स्वीकृत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये रोम इथं जी-20 देशांच्या परिषदेत सर्व देशांच्या नेत्यांनी रोम जाहीरनाम्याचा स्वीकार केला. जी-20 रोम परिषदेनं कोरोनाच्या संकटातून आर्थिक, आरोग्य, रोजगार, शिक्षण, पर्यटन आणि खासकरून पर्यावरण बदलाच्या क्षेत्रात पूर्वपदावर येण्यासाठी स्पष्ट संदेश दिल्याची माहिती जी-20 चे भारताचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रोम इथं पत्रकारांना दिली. कृषी, रोजगार आणि छोटे आणि काठावरचे शेतकरी यांच्यावरही महत्त्वाची चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पेनच्या पंतप्रधानांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. त्यांनी यावेळी स्पेनला विविध क्षेत्रांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याचं आमंत्रण दिलं. जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली. जी-20 परिषदेच्या शेवटच्या दिवशी सर्व देशांच्या प्रमुखांनी हवामान बदल, पर्यावरण आणि धारणाक्षम विकास या मुद्द्यांवर चर्चा केली.