१०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल जगभरातल्या अनेक नेत्यांद्वारे भारताचं अभिनंदन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशानं कोरोना लसीकरणात शंभर कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल जगभरातल्या अनेक नेत्यांनी भारताचं अभिनंदन केलं आहे. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत.लशीची उपलब्धता हे कोरोना संसर्गाविरोधात लढण्याचं महत्वाचं शस्त्र आहे, असं प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितलं. कोरोना संसर्गाविरोधात इतर देशांच्या सहकार्यानं लढण्यास भारत कटिबद्ध आहे,असं मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांचे आभार मानताना सांगितलं.श्रीलंका आणि मालदीव या देशांच्या प्रमुखांनीही केलेल्या अभिनंदनाबद्दल आभार व्यक्त करताना मोदी यांनी, लसीकरणासाठी एकमेकांना केलेल्या मदतीच्या माध्यमातून संबंध अधिक दृढ झाले असल्याचं सांगितलं. मोदी यांनी इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि इतर नेत्यांकडून आलेल्या अभिनंदनाला प्रतिसाद दिला. जंगभरातील अनेक देशाच्या नेत्यांनी भारताचं अभिनंदन केलं आहे.कोरोना संसर्गाविरोधातल्या जागतिक लढाईत जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल आणि भागीदारीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस यांचे आभार मानले आहेत.जागतिक पातळीवर लशीचं समन्यायी पद्धतीनं वाटप ही काळाची गरज असल्याचं मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.