देशभरात ईद - ए - मिलाद सण उत्साहात साजरा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद-ए-मिलादच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोहम्मद पैगंबरांचं आयुष्य म्हणजे बंधुत्त्व, प्रेम आणि करुणा यांचं उदाहरण आहे, आणि ते नेहमीच मानवतावादासाठी एक प्रेरणास्रोत राहील, असं राष्ट्रपतींनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. सर्व विश्वात शांती आणि समृद्धी लाभो, तसंच दया आणि शांती यांचा विश्वात प्रसार होवो, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात शुभेच्छा दिल्या आहेत.प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद-ए-मिलाद हा सण त्यांच्या मानवतावादी कार्याचं तसंच परोपकाराच्या शिकवणीचं स्मरण करुन देतो, असं राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. ईद-ए-मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हजरत पैगंबर यांनी मानव कल्याणाचा मार्ग दाखवला. त्यांनी दिलेल्या शिकवणीला अनुसरून परस्परांचा आदर करूया, स्नेह वृद्धिंगत करूया. उत्सव साजरा करताना एकमेकांच्या आरोग्याचीही काळजी घेऊया. यातून प्रेषितांना अभिप्रेत समाज निर्माण होईल, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ‘ईद-ए-मिलाद’च्या राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ईद’च्या निमित्तानं समाजातल्या गरजू, गरीब बांधवांना आपल्या आनंदात सहभागी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे. मोहम्मद पैगंबर यांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांना प्रेरीत करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.