शिक्षक बंधू-भगिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

मुंबई :  देशाला गुरु-शिष्य परंपरेची गौरवशाली परंपरा आहे. महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख या ध्येयनिष्ठ गुरुजनांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या, ज्ञानवंत, गुणवंत, चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणाऱ्या राज्यातील शिक्षक बंधू-भगिनींचा महाराष्ट्राला अभिमान आहे. देशाची भावी पिढी सक्षम, समर्थ बनविणाऱ्या शिक्षक बांधवांच्या योगदानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ समाजसुधारकांनी, गुरुजनांनी राज्यात शिक्षणाची बीजे रोवली. शिक्षणाची गंगा सामान्यांच्या घरापर्यंत नेली. राज्यात शैक्षणिक क्रांती घडवली. राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या. आजचा संपन्न, समृद्ध, सुसंस्कृत महाराष्ट्र ध्येयवादी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमांवर उभा आहे. शिक्षक-विद्यार्थ्यांची गौरवशाली परंपरा राज्यात आजही कायम असून महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे.