कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीची २ ते १८ वयोगटातल्या मुलांसाठीची भारतातली चाचणी यशस्वी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर करण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे. दिल्लीच्या रुग्णालयात ही चाचणी करण्यात आली. यामुळे लहान मुलांचं लसीकरण करण्यासाठी एक पाऊल पुढे पडलं आहे. केंद्रीय औषध नियंत्रकांच्या परवानगीनंतर ७ जूनपासून कोव्हॅक्सिन लसीची लहान मुलांवर चाचणी करण्यास सुरुवात झाली होती. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या भारत बायोटेकच्या बीबीव्ही १५४ या लसीचीही मानवी चाचणी देशात सुरू आहे. १८ ते ६० वयोगटातील स्वयंसेवकांवर करण्यात आलेली पहिली चाचणी यशस्वी झाली असून आता दुसऱ्या टप्प्यातील निकालाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर तिसरी चाचणीही यशस्वी झाल्यावर ही लस प्रत्यक्ष वापरता येणार आहे. ही लस नाकाच्या आतील भागात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करत असल्याचं जाणकारांचं मत आहे.