राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह संपूर्ण कोकणात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. छत्तीसगढमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे हा पाऊस पडत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं ठाणे,  पालघर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत पावसामुळे आज सकाळी घाटकोपर इथल्या पाच झोपड्यांवर दरडीचा काही भाग कोसळल्यानं दोन जण जखमी झाले. घटनेचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोचून मदत आणि बचावकार्य सुरु केलं.

ठाणे जिल्ह्यातही काल रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नवी मुंबईत आज सकाळच्या दोन तासांमध्ये २० पूर्णांक ३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात पावसानं जोर धरल्यानं गिरणा नदी आणि तिच्या उपनद्यांसह नाल्यांना पूर आलेला आहे, जोरदार पावसामुळे गिरणा धरण वगळता इतर छोट्या मोठ्या प्रकल्पातून गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला. यामुळे दुपारनंतर नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मन्याड मध्यम प्रकल्पही पूर्ण भरल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं मन्याड नदीला पूर आला आहे. त्यामुळे प्रशासनानं गिरणा आणि मन्याड नदी काठाच्या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. परभणीत पालम तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे लेंडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात काल संध्याकाळी एक बैलगाडी वाहून गेली यात दोन बैलांना जीव गमवावा लागला, मात्र बैलगाडीचा चालक बचावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेलू पेंडू नदीला आलेल्या पूराचे पाणी शेलू गावात शिरलं असून, आसपासच्या पिकांचं मोठं नुकसानं झालं. पुरामुळे पालम ताडकळस मार्ग बंद पडला आहे, तर बारा गावांचा पालम शहराशी संपर्क तुटला आहे.

नांदेडमध्ये लोहा तालुक्यातल माळाकोळी महसुल मंडळात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे आसपासच्या नदीनाल्यांना पूर आला आहे. सावरगाव इथं पाणंद नाल्याच्या पुरात दोन महिला वाहून गेल्या यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेचा शोध सुरु असल्याची माहिती लोह्याचे तहसीलदार विजय अवधाने यांनी दिली. पूरामूळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यानं सोयाबीनच्या पिकाचं मोठं नुकसान झालं.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. पासामुळे कन्नड तालुक्यात औट्रम घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. पिशोर इथल्या खडकी नदीला पूर आल्यानं शेतकऱ्यांचा दूधाची वाहतूक करण्यासाठीचा मार्गही बंद झाला आहे. पिंपरखेड नादर इथल्या नदीला पूर आल्यामुळे पिशोरच्या नागरिकांचा संपर्क तुटला आहे. बुलडाण्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात कुठे हलक्या तर कुठे जोरदार सरी बरसत आहे. पावसामुळे बुलढाणा तालुक्यातल्या पाडळी गावात पूर आल्यानं इतर गावांशी संपर्क तुटला आहे.

बीड जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसानं नदी, नाल्यांसह अनेक छोटे मोठे प्रकल्प दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक प्रकल्पांमधल्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली. मुसळधार पावसामुळे काही भागातल्या पिकांच नुकसान झालं, तर काही भागात पिकांना जीवदान मिळालं. उस्मानाबाद शहर आणि परिसरात आजही पावसाचा जोर कायम आहे. जालन्यात आज पहाटेपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. घनसावंगी, अंबड तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून, या भागातल्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. 

घनसावंगी तालुक्यात गोदावरी नदीवरचा मंगरूळ बंधारा शंभर टक्के भरल्याने सकाळी बंधाऱ्याचे आठ दरवाजे उघडले. राजाटाकळी बांधाऱ्यातूनही ७०हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.