निर्बंधीत ११ जिल्ह्यांमध्ये ७० टक्के लसीकरण होत नाही, तो पर्यंत निर्बंध कायम ठेवण्याच्या कोरोना कृती दलाच्या राज्य सरकारला सूचना

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ज्या ११ जिल्ह्यात कोरोनाविषयक तिसऱ्या स्तरावरील निर्बंध कायम आहेत त्या सर्व जिल्ह्यांत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत लसीकरणाच प्रमाण अत्यल्प असल्याचंही निदर्शनास आलं आहे. निर्बंध कायम असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पालघर, बीड आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांमधील लसींच्या दोन्ही मात्र घेऊन संपूर्ण लसीकरण झालेल्यांची संख्या १६ टक्क्यांहून अधिक नाही तर लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाणही ३० टक्क्यांच्या आसपासच असल्याचं निदर्शनास आलं आहे. कोरोनाविषयक राज्यस्तरीय कृती दलानं त्याबद्दल चिंता व्यक्त केली असून, जोपर्यंत या जिल्ह्यांमधे ७० टक्के लसीकरण होत नाही तोपर्यंत निर्बंध कायम ठेवण्याची शिफारस पथकानं केली आहे. मुंबई आणि ठाण्यातही सर्वसाधारणपणे तीच परिस्थिती असल्याचंही कृती पथकानं नमूद केलं असून ही आकडेवारी केंद्र सरकारच्या अधिकृत कोविन अँप वरूनच मिळाली असल्याचंही स्पष्ट केलं आहे. अपुऱ्या लसीकरणाची कारणं काहीही असली तरी लसीकरणाचा वेग वाढत नाही तोपर्यंत निर्बंध शिथिल करणं धोकादायक ठरू शकतं असा इशारा कृती पथकानं दिला आहे.