राज्यात मंगळवारी ७ हजार ७२० रुग्ण कोरोनामुक्त


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनामुक्तीचा दर सातत्यानं वाढत आहे. तर, ॲक्टिव रुग्णांची संख्या कमी होत आहे. धुळे जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण उपचाराधीन नाही. तर, नंदुरबार जिल्ह्यात फक्त ४, गोंदिया जिल्ह्यात २, आणि भंडारा जिल्ह्यात फक्त एक रुग्ण उपचार घेत आहे. काल राज्यभरात ७ हजार ७२० रुग्ण बरे होऊन घरी गेले, ५ हजार ६०९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३७ रुग्ण दगावले.आतापर्यंत एकूण ६३ लाख ६३ हजार ४४२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६१ लाख ५९ हजार ६७६ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३४ हजार २०१ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ६६ हजार १२३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक ८ दशांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १ दशांश टक्के आहे.मुंबईत काल ४०३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली. मुंबईत आतापर्यंत ७ लाख १५ हजार ७९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले  आहेत. काल  २३० नवीन रुग्णांची नोंद झाली, मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या  ७ लाख ३७ हजार ९५४ झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार ७१२ दिवसांवर आलाय. सध्या ३ हजार ७८२ रुग्ण उपचार घेत आहेत. काल कोरोनामुळे ५ रूग्णांचा मृत्यू झाला असून. एकूण मृतांचा आकडा १५ हजार ९५९ वर पोचला आहे.सांगली जिल्ह्यात ८३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल ७३२ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या ७ हजार ४४७ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल या आजारामुळे २३ रुग्णांचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात काल १ रुग्ण बरा होऊन घरी गेला काल १ नवीन रुग्ण आढळला. सध्या १५ रुग्ण उपचार घेत आहेत.नांदेड जिल्ह्यात काल ४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. काल ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला. सध्या ४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यात काल २ रुग्णांनी कोरोनावर मात केली. काल जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नाही. सध्या जिल्ह्यात १५ रुग्ण उपचाराधीन आहेत. जालना जिल्ह्यात काल २४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल जिल्ह्यात १४ बाधित रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात १२७ रुग्ण उपचार घेत आहेत.