संशोधनं शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवा, कृषी विद्यापीठांना राज्यपालांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : वातावरण बदलामुळे दिवसेंदिवस विविध आव्हानं निर्माण होत आहेत. यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकात्म भावनेनं आपलं योगदान दिल्याशिवाय पर्याय नाही असं स्पष्ट मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे. राज्यपालांनी काल परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बांबू प्रकल्प, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, कृषी अभियांत्रिकी, फुड टेक्नॉलॉजी, मुलींचं वसतिगृह, ग्रंथालय आदी विभागाची पाहणी करुन प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आव्हानं किती जरी आले तरी नव्या पिढीपर्यंत नवनिर्मितीचे संकल्प पोहोचले पाहिजेत. नव्या पिढीला प्रेरणा मिळाल्या पाहिजेत आणि ही विद्यापीठाची जबाबदारी आहे असं राज्यपाल म्हणाले.  कृषी क्षेत्रासंदर्भात अनेक ठिकाणी विविध संशोधनं सुरू आहेत. नवी संशोधनं जितक्या लवकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोतील तितक्या लवकर त्यांची उपयोगिता सिध्द होईल. त्यासाठीही विद्यापीठांनी पुढे यायला हवं असं मतही त्यांनी व्यक्त केलं. परभणी इथे प्राच्यविद्या संशोधन केंद्रास मान्यता देवून जागा आणि आवश्यक तो निधी ऊपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली.