रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ९ तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.रायगड जिल्ह्यात सावित्री आणि काळ नद्यांचं पाणी महाड शहरात घुसलं असून काल सायंकाळपासून महाड चा अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. पोलादपूर - महाबळेश्वर रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पोलादपूरचं रान बाजिरे धरण धोका पातळीपेक्षा जास्त भरलं आहे. खोपोलीत सखल भागातल्या घरांमधे पाणी शिरल्यानं ५३ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत ही वाढ झाल्याने आपटा परिसर जलमय झाला आहे. उल्हास नदीला मोठा पूर आला असून पाणी कर्जत शहरात घुसलं आहेरायगडमधये सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असून आज जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात परशुराम घाटात दरड कोसळल्यानं ३ जणांचा मृत्यू झाला. जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, शास्त्री, सोनवी आणि बावनदी या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, तर लांजा तालुक्यातल्या मुचकुंदी नदीनं इशारा पातळी ओलांडली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. संगमेश्वर आणि राजापूरमधे पाणी शिरलं असून मदतकार्य चालू आहे. पावसाचा जोर मात्र आज सकाळपासून काहीसा मंदावला असल्यामुळे पूर ओसरण्याची शक्यता आहे. खेड आणि चिपळूण तालुक्यात समुद्राच्या जोरदार लाटा आणि नद्यांना पूर आल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असल्याचे आमच्या वार्ताहराने कळवले आहे. चिपळूणमध्ये अनेक इमारतींना वाशिष्ठी नदीच्या पुराने वेढा दिला असून नगरपालिका दोन बोटींमधून बचावकार्य करत आहे. पुण्याहून एनडीआरएफच्या दोन तुकड्या खेड आणि चिपळूणसाठी रवाना झाल्या आहेत. कोकणात मदतीसाठी तटरक्षक दलाची हेलीकॉप्टर्स मिळावी अशी विनंती रत्नागिरी - सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याच्या सूचना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातले नदी-ओहोळ दुथडी भरून वाहताहेत. भात शेती पाण्याखाली गेली आहे. ठिकठिकाणचे रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडून मालमत्तेचं नुकसान झालं. कुडाळ तालुक्यात २७ गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूरला जोडणाऱ्या करूळ आणि भुईबावडा घाटातली वाहतूक बंद आहे. आंबोली आणि फोंडाघाट मार्गे कोल्हापूर वाहतूक सुरु आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. कणकवली तालुक्यात खारेपाटण इथं सुख नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी बाजारपेठेत घुसले. किनारी भागात सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.