पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

  पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई (वृत्तसंस्था) :  अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण करावी.  आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून व दु:ख जाणून संवेदनशीलतेने ही प्रक्रिया पार पाडावी. एकही नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी गत  दोन दिवसांत पुसदा, शिराळा, खारतळेगाव, रामा, साऊर, टाकरखेडा संभू,देवरा, देवरी, ब्राम्हणवाडा आदी अतिवृष्टीग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर याबाबतची कार्यवाही व प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त आरती सिंह, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, अपर पोलीस अधिक्षक श्याम घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी शेतीनुकसानीचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावेत. काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्याच्या अचूक नोंदी अहवालाद्वारे घ्याव्यात. यासाठी तालुका कार्यालयांनी वेळोवेळी अपडेट माहिती दिली पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना भरपाई मिळण्यासाठी परिपूर्ण अहवाल द्यावेत. मेळघाटातही पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया गतीने राबवावी. नागरिकांना आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात.

पुसदा येथील पुलाची उंची वाढवा

पूर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहे. त्यासाठी बांध, नाला खोलीकरण आदी कामे पूर्ण करावीत. पुसदा, शिराळा येथे पूर नियंत्रणासाठी नाल्याचे, पुलाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. अतिवृष्टीने आलेल्या महापुराने अमरावती- चांदूर बाजार रस्त्यावरील पुसदा गावालगतचा पूल जाम होऊन वाहतूक खोळंबली. शेतीचेही नुकसान झाले. त्यामुळे तेथील पुलाची उंची व रूंदी वाढविण्यासाठी काम राबविण्यात यावे. हे काम गतीने पूर्ण झाले पाहिजे, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी मुख्य सार्वजनिक बांधकाम अभियंता अरुंधती शर्मा यांना दिले.

प्राथमिक निष्कर्षानुसार 500 गावे, 23 हजार हेक्टर शेती बाधित                                  

पंचनामा प्रक्रिया व प्राथमिक अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 500 गावे बाधित असून, सुमारे 23 हजार 555 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. शेतजमिन खरडून झालेले नुकसानीचे क्षेत्र 881 हेक्टर आहे. 142 गावांत पंचनामे पूर्ण झाले असून, 258 गावांत सुरू आहेत.

अमरावती तालुक्यात 14 गावे व 500 हेक्टर शेती, भातकुली तालुक्यात 137 गावे व 6 हजार 22 हेक्टर शेती बाधित आहे. भातकुली तालुक्यात शेतजमीन खरडून नुकसानीचे क्षेत्र 669 हेक्टर व चांदूर रेल्वे तालुक्यात 27 गावे बाधित व 119.92 हेक्टर शेतजमीन खरडून नुकसान झाले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेतजमीन खरडून नुकसानीचे क्षेत्र 15.79 हेक्टर व बाधित गावांची

दर्यापूर तालुक्यात मोठे नुकसान

दर्यापूर तालुक्यात 154 गावे व 12 हजार 844 हेक्टर शेती बाधित आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात 45 गावे व 393 हेक्टर शेती बाधित आहे. चिखलदरा तालुक्यात 73 गावे व 1 हजार 108 हेक्टर शेती बाधित आहे. चांदूर बाजार तालुक्यात 43 गावे व 2 हजार 549 हेक्टर शेती बाधित आहे.

जिल्ह्यातील वलगाव, भातकुली, आसरा, खोलापूर, चांदुर, घुईखेड, सातेफळ, पुसला,बेनोडा, दर्यापूर, दारापूर, खल्लार, थिलोरी, येवदा, अंजनगाव, सातेगाव, कोकर्डा, चांदुर, तळेगाव दशासर, सावलीखेडा, धारणी, हरिसाल, धुळघाट, सादराबाडी या मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जादा पाऊस झाला.

जीवितहानी झालेल्या कुटुंबांना मदत मिळवून द्या

नैसर्गिक आपत्तीमुळे जीवितहानी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना तत्काळ मदत मिळवून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. अमरावती तालुक्यात वीज पडून 1, भातकुली तालुक्यात पुरात वाहून गेल्याने 2, धामणगाव रेल्वे तालुक्यात वीज पडून 2, दर्यापूर तालुक्यात चक्रीवादळाने भिंत पडल्याने 1, धारणी तालुक्यात वीज पडून 1 अशी जीवितहानी झाली. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील 1 व्यक्ती पुरात वाहून गेली. अचलपूर तालुक्यात 1 व्यक्ती वीज पडून जखमी झाली.

पावसामुळे शेतीत चिखल असल्याने पोहोचण्यास अडथळे येतात. असे असले तरी शक्य तिथे पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे निर्देश देण्यात आले.उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, नितीनकुमार हिंगोले, रणजित भोसले, मनोज लोणारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, तहसीलदार संतोष काकडे, नीता लबडे, योगेश देशमुख, जगताप आदी उपस्थित होते.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image