कोरोना महामारीच्या काळात गौतम बुद्धांचे विचार समर्पक - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जिथे ज्ञान आहे तिथेच पूर्णत्व आहे, आणि तीच पौर्णिमा आहे आणि जेव्हा उपदेश देणारे स्वतः बुद्ध असतील तर हे ज्ञान संसाराच्या कल्याणाचा पर्याय ठरेल,असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे, आषाढ पौर्णिमा धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्याग आणि तितिक्षा यातून तप:पूंज झालेले गौतम बुद्ध जेव्हा बोलतात, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ते धम्मचक्र प्रवर्तन असतं. यामुळेच, त्यावेळी त्यांनी केवळ पाच शिष्यांना उपदेश केला होता, मात्र आज संपूर्ण जग त्यांच्या शब्दांचे, ज्ञानाचे अनुयायी झाले आहेत. बुद्धाच्या विचारांवर आस्था ठेवणारे लोक आहेत, असंही ते म्हणाले.आज कोरोना महामारीच्या रूपाने, मानवतेसमोर तसेच संकट उभे ठाकले आहे. अशावेळी भगवान बुद्ध आपल्यासाठी अधिकच प्रासंगिक ठरतात. बुद्धाच्या मार्गावरुन चालतच आपण मोठ्यात मोठ्या आव्हानावर कशी मात करु शकतो, हे भारताने आज करुन दाखवले आहे. बुद्धाचेच सम्यक विचार मनात घेत आज जगातील इतर देशही एकमेकांची साथ देत आहेत, एकमेकांची ताकद बनत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.