विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं दीर्घ आजारानं निधन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विख्यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटसृष्टीतल्या बदलत्या प्रवाहानुसार त्यांनी भूमिका साकारल्या. ट्रॅजिडी किंग, अंग्री यंग मॅन आणि हलक्याफुलक्या भूमिकांसह त्यांनी अभिनयातलं अष्टपैलूत्व सिद्ध केलं. अभिनयाची सहज-स्वाभाविक खास शैली त्यांनी लोकप्रिय केली. त्यामुळे त्यांना अभिनयाची शाळाच मानलं जाई.

दिलीप कुमार यांनी ‘नया दौर, दाग, ‘अंदाज’, ‘आजाद’, मुघले-ए-आझम, ‘राम और श्याम’,’ ‘क्रांती’, 'शक्ती’, ‘कर्मा’, ‘मधुमती’, ‘मशाल’ अशा अनेक चित्रपटांमधून अभिनयाची छाप पाडली होती. ‘मुघले-ए-आझम’ आणि ‘देवदास’ चित्रपटांमधल्या अभिनयानं त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 

उत्कृष्ट अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना ८ वेळा मिळाला. चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च सन्मान समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना १९९४ मधे मिळाला. भारत सरकारनं त्यांना १९९१ साली पद्मभूषण, तर २०१५ ला  पद्मविभूषण या नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. पाकिस्तान सरकारनंही १९९८ त्यांना निशाने इम्तियाज पुरस्कारानं गौरवलं. ते २००० ते २००६ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. 

दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल राष्ट्पती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. दिलीपकुमार हे स्वतःच भारताच्या इतिहासाचा लेखाजोखा होते, त्यांच्या निधनानं एका युगाचा अंत झाला आहे, असं ट्विट राष्ट्रपतींनी केलं आहे.

तर, दिलीपकुमार हे चतुरस्र अभिनेते होते. नैसर्गिक अभिनयामुळे ते स्वतःच अभिनयाची शाळा बनले, आणि शास्त्रशुद्ध अभिनयाचा पाया त्यांनी घातला, त्यांच्या निधनानं चित्रपट सृष्टीत निर्माण झालेली पोकळी भरून निघणार नाही, असं व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.

तर, दिलीपकुमार यांनी त्यांच्या अद्वितीय प्रतिभेनं अनेक पिढ्यांना भारुन टाकलं होतं. त्यांच्या निधनानं आपल्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी झाली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. दिलीप कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीतले पहिले सुपरस्टार होते. चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळातील ते नायक होते. त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही, अशा शब्दात राज्यपालांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीपकुमार राहत असलेल्या खार इथल्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं, आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासमवेत उपस्थित होते. दिलीपकुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला अशा शब्दांत ठाकरे यांनी दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली आहे. 

अजरामर भूमिका साकारणारे, दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर, दिलीपकुमार यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला आहे. प्रत्येक अभिनेत्याचं 'दिलीपकुमार' बनण्याचं स्वप्न असायचं, ते स्वप्न दाखवणारा जादूगार आज स्वतःच अदृश्य झाला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनीही आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही दिलीपकुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. दिलीप कुमार यांची शैली अतुलनीय होती असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

 

 

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image