राज्यात डिसेंबरपर्यंत ५ हजार पोलिसांची भरती करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात लवकरच मोठ्या प्रमाणात पोलीस भरती केली जाणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. डिसेंबरपर्यंत सुमारे ५ हजार पेालिसांची भरती केली जाईल, तर त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे ७ हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.  

पोलीस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर तो किमान पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, यादृष्टीनं योजना तयार केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कायदा सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे सिध्दतेचं प्रमाण वाढवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. 

पोलिसांनी  प्रभावीपणे कारवाई करत सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा, असे निर्देशही वळसे पाटील यांनी दिले. विविध समाजमाध्यमांद्वारे दैवते, प्रसिध्द व्यक्ती, समाजपुरुष यांची बदनामी करणाऱ्या आक्षेपार्ह प्रसारणाचं प्रमाण सध्या वाढत आहे. त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी गृहविभाग प्रयत्नशील असून अधिक परिपूर्ण प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पूरक सूचना, उपाय सादर करावेत, असं त्यांनी सांगितलं. कोरोना काळात पोलीस दलानं कौतुकास्पद कामगिरी केली आहे, असं ते म्हणाले. जिल्ह्यांमध्ये पोलीस दल अधिक सक्षम बनवण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतून निधीची मागणी करा, अशी सूचना त्यांनी केली.