परंपरा आणि तंत्रज्ञान ही आत्मनिर्भर भारताची शक्ती असून खेळ आणि खेळणी निर्मितीत त्याचा संगम पहायला मिळत आहे- प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परंपरा आणि तंत्रज्ञान ही आत्मनिर्भर भारताची शक्ती असून खेळ आणि खेळणी निर्मितीत त्याचा संगम पहायला मिळतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. टॉयकेथॉन २०२१ मध्ये सहभागी झालेल्यांशी ते संवाद साधत होते. लहान मुलांमधे भारतीय संस्कृतीची मूल्यं रुजवणारी, सकारात्मक दृष्टीकोन घडवणारी, अभिनव खेळणी तयार करण्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सध्या बहुसंख्य ऑनलाईन खेळ आणि खेळण्यांमागची संकल्पना भारतीय नाही. अशी खेळणी हिंसा किंवा मानसिक ताणाला कारण ठरतात असं सांगून ते म्हणाले की राष्ट्रीय चारित्र्य घडवण्यात खेळणी उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे. सध्या योगसाधना जगात लोकप्रिय होत असून त्यावर आधारित खेळणी घडवण्याचं आवाहन त्यांनी सहभागी झालेल्यांना केलं.

तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा कस पाहणाऱ्या टॉयकेथॉन किंवा हॅकेथॉन सारख्या स्पर्धांमधून अनेक समस्यांची उत्तरं मिळू शकतात अशा शब्दात त्यांनी या स्पर्धांचं महत्त्व अधोरेखित केलं. खेळण्यांची जागतिक बाजारपेठ सुमारे १०० अब्ज डॉलर्सची असून सध्या देशातली ८० टक्के खेळणी आयात केलेली असतात. खेळण्यांचं स्थानिक उत्पादन बाजारात अधिक विकलं जाणं आवश्यक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले.

केंद्रीय शिक्षण, महिला आणि बालकल्याण, एमएसएमई, वस्त्रोद्योग, माहिती आणि प्रसारण मंत्रालयं तसंच अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण मंडळाने मिळून टॉयकेथॉन आयोजित केली आहे. प्राथमिक फेरीतल्या १७ हजार कल्पनांपैकी निवडक १ हजार ५६७ कल्पना या अंतिम फेरीत सहभागी होत आहेत. रेल्वे मंत्री पियुष गोयल, शिक्षण राज्य मंत्री संजय धोत्रे कार्यक्रमाला उपस्थित होते.