प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनीने रिफ्टेक्टर्स बसविणे बंधनकारक : परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे

 

पिंपरी : माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दुचाकींसह सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणा-या वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनींचे प्रतिबिंबित करणारे परावर्तक (रिफ्लेक्टर्स) बसविणे बंधनकारक आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल रिट याचिकेच्या निर्णयानुसार देशातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीची स्थापना केली असून, या समितीने रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणा-या मृत्यूमध्ये दरवर्षी दहा टक्के घट करणेबाबत निर्देश दिले आहेत. रात्रीच्या वेळी होणारे रस्ते अपघात हे मुख्यत: रस्त्यांवर उभे असलेल्या तसेच कमी वेगाने चालणा-या जड वाहनांची दृष्यमानता कमी असल्यास अशा वाहनांवर अन्य वाहने आदळून धडकतात. रात्री प्रवास करणारी वाहने ही प्रामुख्याने जड मालवाहतूक वाहने असल्याने त्यांची दृष्यमानता वाढविण्यासाठी त्यावर मान्यताप्राप्त कंपनींचे परावर्तक (रिफ्लेक्टर्स), रिफ्लेटिव्ह टेप्स आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट / टेप बसविणे अनिवार्य असून त्याबाबत केंद्र सरकारने केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 104 ते 104 - ई मध्ये वेळोवेळी सुधारणा केली आहे.

दुय्यम दर्जाची किंवा बनावट उत्पादने विक्री करुन ग्राहकांची फसवणूक होत असल्याबाबत अनेक निवेदने या कार्यालयास प्राप्त झाली आहेत. त्यांचा विचार करुन आणि रस्त्याचा वापर करणा-या इतर घटकांची सुरक्षितता अबाधित रहावी या करीता वाहनांना परावर्तक रिफ्लेटिव्ह टेप्स आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट / टेप बसविण्याबाबत परिपत्रके जारी करण्यात आली आहेत.

केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 104 ते 104 - ई च्या तरतुदीनुसार AIS 089 व AIS 090 च्या मानकांची पुर्तता करणा-या ओराफोल इंडिया प्रा. लि., अवरी डेनिसन इंडिया प्रा. लि. आणि डाओमिंग रिफ्लेटिव्ह मटेरिअल इंडिया प्रा. लि. या कंपनींच्या परावर्तक (Reflectors), रिफ्लेटिव्ह टेप्स (Reflective Tapes)आणि रियर मार्किंग प्लेट / टेप चा वापर करणे खालील प्रकारच्या सर्व वाहनांवर बंधनकारक आहे. दुचाकी वाहने, 3.5 टन (GVW) पर्यंत क्षमतेची मालवाहू वाहने (तीनचाकी वाहनांसह), 3.5 टन ते 7.5 टन क्षमता असलेली मालवाहू वाहने, 7.5 टन क्षमतेपेक्षा जास्त वजन असलेली मालवाहू वाहने, 8 पर्यंत आसन क्षमतेची (मोटार कार, ओमानी बस इ.) प्रवासी वाहने, 9 व 9 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेली तसेच 5 टन (GVW)पर्यंत क्षमतेची प्रवासी वाहने, 9 व 9 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेली तसेच 5 टन पेक्षा जास्त (GVW)क्षमतेची प्रवासी वाहने, ॲग्रीकल्चर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कंम्बाईन हार्वेस्टर, एन संवर्गातील प्राईम मुव्हरला जोडलेले ट्रेलर व सेमी ट्रेलर, बांधकाम साहित्य वाहुन नेणारी वाहने आणि मॉड्यूलर हायड्रॉलिक ट्रेलर अशा सर्व वाहनांमागे मान्यताप्राप्त कंपनींचेच परावर्तक रिफ्लेटिव्ह टेप्स आणि मागील बाजूस रियर मार्किंग प्लेट / टेप बसवावेत.

ज्या उत्पादकाचे उत्पादन AIS 089 वा AIS 090 मानकांचे उल्लंघन करीत असल्याचे वा दुय्यम प्रतवारीचे (डुप्लीकेट) बसविण्यात आल्याचे निदर्शनास येईल तो उत्पादक मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 190 (2) च्या तरतुदींसह बँक हमीची रक्कम जप्त करुन समायोजित करण्याच्या तसेच अनुषंगीक दंडात्मक कारवाईस पात्र ठरेल. असे निदर्शनास आल्यास प्रादेशिक परिवहन अधिकारी / उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी अशा प्रकरणी संबंधित वितरकाचे व्यवसाय प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावे. तसेच सदर उत्पादनाच्या किंमती निश्चित करुन या विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित कराव्यात. किंमतीतील बदलाबाबत वेळोवेळी परिवहन आयुक्त कार्यालयास कळवावे. निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम वाहनधारकाकडून अधिकृत वितरकाव्दारे आकारण्यात येणार नाही. याची खात्री करावी व त्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. या आदेशाबाबत काहीहि शंका असल्यास dytcenfl.tpt-mh@gov.in किंवा dycommr.enfl@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. असेही आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.