राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. त्यानिमीत्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा आग्रह धरला. अनेक अनिष्ट चालीरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनाशी निगडित क्षेत्रात दूरगामी अशी धोरणे राबवलं, त्यांनी कृषी, सहकार, उद्योग या क्षेत्रांच्या विकासासाठी दूरदृष्टीने योजना राबवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहूंनी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले.  त्यांच्या या कार्याला कोटी कोटी प्रणाम असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहु महारांजांच्या जयंतीनिमीत्त त्यांना अभिवादन केलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शेतकऱ्यांचे तारणकर्ते, बहुजनांचे पालनकर्ते होते. त्यांनी सामाजिक सुधारणा करून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक न्यायाचे विचार मार्गदर्शक असून त्या विचारांवरच राज्याची आजही वाटचाल सुरु आहे असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी  शाहू महाराजांच्या प्रतिमेला  पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज जिल्हा पोलीस अधीक्षकांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.