पी-1, पी-2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास बंधन घातल्यास बाजारपेठ बंद करु : श्रीचंद आसवाणी

 

पिंपरी : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे मार्च 2020 पासून पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश काळ लॉकडाऊन मुळे व्यापा-यांना दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. जून महिण्यापासून अंशता: दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतू मनपा प्रशासन लवकरच पिंपरी कॅम्पमध्ये पी-1, पी-2 प्रमाणे दुकाने उघडी ठेवण्याचे बंधन घालणार आहे. यास पिंपरीतील सर्व व्यापा-यांचा तीव्र विरोध आहे. असे झाल्यास पिंपरीतील सर्व व्यापारी व्यापार बंद ठेवून मोर्चा काढून महापालिकेच्या प्रवेशव्दारासमोर ठिय्या आंदोलन करतील असा इशारा पिंपरी मर्चंन्ट फेरडेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी दिला आहे.

सुरु असणा-या लॉकडाऊन मध्ये सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवावी लागतात. शनिवारी व रविवारी पुर्ण दिवस दुकाने बंद ठेवावी लागतात. पी-1, पी-2 मुळे आठवड्यातून दोनच दिवस दुकाने सुरु ठेवावी लागतील. यातून कामगारांचे पगार देखील वसूल होणे अवघड आहे. व्यापा-यांना वीजबील व मिळकत करात आणि जीएसटीमध्ये सवलत मिळावी ही मागणी प्रलंबित असताना तसेच ग्राहकांची क्रयशक्ती कमी झालेली असताना व्यापा-यांवर बंधन घालणे अन्यायकारक आहे, यास पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा तीव्र विरोध असल्याचे पत्रक पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

पी-1, पी-2 चा नियम हा फक्त पिंपरी कॅम्पमधिल व्यापा-यांनाच लागू करणे हे आक्षेपार्ह आहे. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सोमवार दि. 14 जून पासून ज्याप्रमाणे सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील व्यापा-यांना परवानगी मिळावी. पुणे मनपा हद्दीतील कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील पॉझिटिव्हीटीचा दर 5.2 टक्के आहे. मनपा प्रशासनाने पिंपरी कॅम्प परिसरातील अतिक्रमण, बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे पथारीवाले, फेरीवाले यांना प्रथम हटवावे. तसेच ग्राहकांना गर्दिच्या वेळी वाहने लावण्यास जागा उपलब्ध करुन द्यावी अशीही मागणी श्रीचंद आसवाणी यांनी केली.

व्यापारी आवश्यक ती दक्षता घेत आहेत. ग्राहकांनी देखिल नियमांचे पालन करावे. मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी व्यापा-यांचा या आवाहनाचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेरडेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केली आहे.