इंडियन क्रिकेट लीगचा चालू हंगाम पुढे ढकलला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल अर्थात इंडियन क्रिकेट लीगचा चालू हंगाम पुढं ढकलायचा निर्णय आयपीएल संचालक परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं घेतला आहे. त्यांनी आज तातडीनं आयोजित केलेल्या बैठकीत तडकाफडकी पुढचे सामने थांबवायचा निर्णय एकमतानं घेतला.

देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या या हंगामावर सर्व थरातून टीका होत होती. खेळांडूच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्थापनानं उपाययोजना केल्या होत्या. मात्र तरीही अलीकडेच अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, आणि आयोजनात सहभागी असलेल्या इतरांची सुरक्षितता, आरोग्य आणि कल्याणाचा विचार करुन हा निर्णय घेतला असल्याचं आयपीएलनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.