देशात लशींचे उत्पादन वाढवण्याकरता सरकार पुरेसे प्रयत्न करीत नसल्याचा दावा खोटा - सरकारचे स्पष्टीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरण हा कोविड विरुद्धच्या लढ्याचा आधारस्तंभ आहे. देशात लसीकरण वेगाने व्हावं याकरता सरकारने याविषयीच्या धोरणाचा तिसरा टप्पा राबवायला आधीच सुरुवात केली आहे. मात्र अद्याप लसीकरणाविषयी अनेक गैरसमज आढळून येतात.

देशात लशींचे उत्पादन वाढवण्याकरता सरकार पुरेसे प्रयत्न करीत नसल्याचा गैरसमज आढळून येतो. हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

लशींचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारी आणि खाजगी उत्पादक कंपन्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. भारत बायोटेकने उत्पादन केंद्र वाढवली असून येत्या ऑक्टोबरपर्यंत दरमहा १० कोटी मात्रांचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सीरम इन्स्टीट्यूटनेही लस उत्पादनात दरमहा ११ कोटी मात्रांचे उद्दिष्ट ठेवले आहे. रशियात विकसित झालेली लस स्पुटनिक फाईव्हचे उत्पादन ६ भारतीय कंपन्यांमार्फत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारत बायोटेकमधे नाकातून घेण्याची एकाच मात्रेची लस विकसित करण्यावर संशोधन सुरु आहे.

या सर्व प्रयत्नांचा एकत्रित परिणाम म्हणून या वर्ष अखेरीपर्यंत लशीच्या २०० कोटी मात्रा उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.