कोविडच्या वर्षामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी समर्पण आणि महा प्रयत्नांद्वारे सेवेतील सर्व विक्रम मोडीत काढले - पियुष गोयल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या वर्षामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी समर्पण आणि महा प्रयत्नांद्वारे सेवेतील सर्व विक्रम मोडीत काढल्याचं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं असून त्याबद्दल त्यांनी रेल परिवाराचे आभार मानले आहेत. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात गोयल यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर रेल परिवार या अभूतपूर्व संकटात विजयी ठरला असल्याचं म्हटलं आहे. या दरम्यान प्राणाला मुकलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची आठवण आपण कधीच विसरणार नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे.

लोक आपापल्या घरांमध्ये असताना रेल्वेला रुळांवरुन धावती ठेवण्याचं काम हे कर्मचारी करत होते, देशभरात व्यवहार ठप्प झाले तेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी एकही दिवस सुटी घेतली नाही, उलट त्यांनी या अवघड काळात अधिकच मेहनतीनं काम केलं आणि वैयक्तिक जोखीम पत्करुन अर्थव्यवस्थेची चाकं फिरती ठेवली असं गोयल यांनी म्हटलं आहे. अत्यावश्यक मालाचा अखंड पुरवठा, वीज प्रकल्पांसाठी कोळसा, शेतकऱ्यांसाठी खतं किंवा देशभरातील ग्राहकांसाठी अन्नधान्य पुरवठा या सर्व बाबतीत रेल्वे आघाडीवर राहिली. देशभरात अडकून पडलेल्या सुमारे 63,00,000 नागरिकांना 4,621 श्रमिक रेल्वेंद्वारे त्यांच्या घरी पोहोचवण्यात आलं. किसान रेल सेवेनं अन्नदात्यांना थेट मोठमोठ्या बाजारपेठेपर्यंत जोडलं. 6,000 किलोमीटरहून अधिक रेल्वेमार्गांचं विद्युतीकरण करण्यात आलं. कोविड-19 च्या विरुद्ध लढाईमध्ये रेल परिवारानं दिलेलं निःस्वार्थ योगदान देश कधीच विसरणार नाही, असं गोयल यांनी पत्रात नमूद केलं आहे.