कोरोना उद्रेकाला येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उतार पडण्याचा वैज्ञानिकांचा अंदाज

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड महामारीच्या उद्रेकाला येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उतार पडेल असा राष्ट्रीय पातळीवरच्या वैज्ञानिकांचा अंदाज असल्याचं राज्य कोविड सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं आहे.

गेले काही दिवस राज्यात दररोज ६० हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. पहिल्या लाटेत गेल्यावर्षीच्या सप्टेंबर मधे रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली होती.

एका विशिष्ट कालावधीत रुग्णसंख्या शिगेला पोचते आणि नंतर हळूहळू कमी होते असं आतापर्यंत दिसून आलं आहे.

दुसऱ्या लाटेत रोजची रुग्णसंख्या ६०-७० हजाराच्या पलिकडे गेल्यानंतर आणखी वाढण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्यासाठी सर्वांनीच कोविड प्रतिबंधासाठीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले.