कोरोना आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये, तर अँटीजेन टेस्ट दीडशे रुपयात होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा केली आहे. त्यानुसार आता आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारले जाणार आहेत. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दरही कमी केले असून अँटीजेन टेस्ट १५० रुपयात होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केली. यासंदर्भात आरोग्य विभागानं शासन निर्णयही जारी केला आहे.

यापूर्वी राज्य शासनानं सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करत ते ४ हजार ५०० रुपयांवरुन अनुक्रमे १ हजार २००, ९८० आणि ७०० रुपये असे केले होते. काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी ५००, ६०० आणि ८०० असे सुधारित दर निश्चित केले आहेत. संकलन केंद्रावरुन नमुना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणं या सर्व बाबींसाठी ५०० रुपये  आकारले जातील.

रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटरमधल्या प्रयोगशाळेत नमुना तपासणी आणि अहवाल यासाठी ६०० रुपये, तर रुग्णाच्या घरुन नमुना घेऊन त्याचा अहवाल देण्यासाठी ८०० रुपये आकारले जाणार आहेत. राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही,  असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी नमूद केलं आहे.

रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित केले आहेत. २५०, ३०० आणि ४०० रुपये असे दर निश्चित केले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३५०, ४५०, आणि ५५०, तर रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी १५०, २०० आणि ३०० रुपये असे दर आता निश्चित केले आहेत.